LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 May 2018

बोस - निकृष्ट दर्जाचा स्पीकर ते सर्वोत्कृष्ट ऑडिओ ब्रँडचा प्रवासबोस कंपनी ऑडिओ क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड आहे. मागील ०५ दशकांहून अधिक काळापासून ध्वनीविज्ञानातील गहन संशोधनावर आधारित स्पीकर, हेडफोन आणि ऑडिओ उपकरणांची निर्मिती करत आहे. १९६० च्या दशकात कंपनीने अत्याधुनिक पद्धतीने स्पीकर्स ची निर्मिती करण्यास सुरवात केली. जगातील पहिल्या व्यावसायिक Noise Cancellation Headphones आणि कार्स साठीच्या ऑडिओ सीस्टीम्स ची निर्मिती केली. आज बोस निर्मित हेडफोन्स अंतराळवीर व प्रोफेशनल पायलट्स द्वारे वापरले जातात. बोस कार ऑडिओ सिस्टिम Maserati आणि Maybach सारख्या लक्झरी कार ब्रॅण्डमध्ये वापरले जातात.

बोस चे संस्थापक अमर बोस हे ऑडिओ निर्मिती क्षेत्रात येण्या आधी १९५० च्या दशकात MIT संस्थेत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे U.S. नौदल आणि NASA सारख्या शासकीय संस्थासाठीही licensing power conversion and amplification technology मध्ये काम केले. लहानपणापासूनच अमर यांना ऑडिओ व इलेक्ट्रॉनिक विषयांबद्दल कुतुहूल होते. वयाच्या १० व्या वर्षी स्काऊट च्या कॅम्प ला गेले असताना मित्रांपैकी कोणीतरी आणलेल्या खेळण्यातील रेडिओ कम्युनिकेशन किट ने त्यांचे लक्ष वेधले. रेडिओ लहरींद्वारे होणाऱ्या संवादाने त्यांचे कुतुहूल जागृत झाले. पुढे वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना रेडिओ दुरुस्त करण्याचा छंद जडला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वडिलांच्या शिपिंग व्यवसायावर आलेल्या बंदीमुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी घराच्या तळघरात रेडिओ छंदाचे रूपांतर व्यवसायात झाले.
पुढे परिस्थिती फारशी चांगली नसतानाही वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी MIT संस्थेतून PhD पूर्ण केली. या आनंदात त्यांनी स्वतःला एक छानसा High End ऑडिओ सिस्टिम भेट म्हणून घ्यायचे ठरविले. हा ऑडिओ सिस्टिम घेताना एखाद्या तरुण अभियंत्याप्रमाणे त्यांनी बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध ऑडिओ सिस्टिम्स चे विश्लेषण केले, आणि त्यातील विशेष वैशिष्ट्यांचा अभ्यास करून सर्वोत्तम अशा ऑडिओ स्पीकर ची निवड केली.घरी आणल्यावर मात्र त्या ऑडिओ स्पीकर चा परफॉर्मन्स त्यांच्या मनासारखा नव्हता. साधारण अमेरिकन ज्याप्रमाणे आपल्या लहान मुलांना व्हायोलिन शिकवतात त्याचप्रमाणे अमर यांच्या पालकांनी त्यांना व्हायोलिन चे प्रशिक्षण दिले होते, त्यामुळे वादनात गती नसली तरी त्यांना संगीताचा कान होता. त्यामुळे तो ऑडिओ स्पीकर कसा सुरेल वाजणे अपेक्षित होते हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळे त्या महागड्या ऑडिओ सिस्टिम ची काळजीपूर्वक निवड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली. याच घटनेने बोस कॉर्पोरेशन ची मुहूर्तमेढ रोवली.
त्यामुळे त्यांनी आपल्या फावल्या वेळेत ध्वनीशास्त्र या विषयावर संशोधन करण्यास सुरुवात केली.  
दिवसा ते आपल्या सहकाऱ्यांसोबत शासकीय कामे करत व रात्री संशोधन करत असत. प्रयोगासाठी त्यांनी बर्कशायरमधील टेंग्लवुड म्युझिक सेंटरमध्ये ग्रिनेमध्ये बोस्टन सिम्फनीचे रेकॉर्डिंग देखील केले. चाचणी साठी हेडफोन्स मानवी पुतळ्यांच्या कानाला लावून कॉन्सर्ट हॉल मध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात येत. या प्रयोगाचा उद्देश एका व्यक्तीकडे थेट संगीत कशा आवाजात येईल हे रेकॉर्ड करणे होते.त्यांनी पहिले निर्माण केलेले उत्पादन 2201 हे अगदीच अपयशी ठरले. त्याचा आकार इंग्रजी 8 सारखा होता, जेणेकरून ते घराच्या खोलीतील कोपऱ्यात हि राहू शकत होते. हे स्पीकर्स तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट होते. त्याचा आवाज अतिशय उत्तम दर्जाचा होता परंतु याचे डिझाईन ही एक व्यावसायिक व्यथा होती. ज्यांच्या घरात दोन उत्तम कोपरे आहेत अशा लोकांची संख्या कमी असल्याने हे उत्पादन गडबडले. किंमत जास्त असल्याने इतर स्पर्धकांशी स्पर्धा करणे कठीण झाले. मार्केटिंग सल्लागाराच्या निर्देशानुसार पहिल्या वर्षी 2201 स्पिकर्स ची २ मिलियन डॉलर ची विक्री अपेक्षित होती परंतु प्रत्यक्षात फक्त ३० संचाची विक्री झाली. हे अपयश फार मोठे होते. परंतु तरीही कंपनी अतिशय उच्च दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करत होती. त्यानंतर त्यांनी 901 हे उत्पादन बाजारात आणले. यामध्ये आधीच्या 2201 मधील वैशिष्ट्ये होतीच परंतु मूलभूत फरक होता तो म्हणजे ध्वनी चे परावर्तन थेट श्रोत्यांवर न होता, भिंतीवर होत होते. त्यावेळेच्या इतर सुप्रसिद्ध व प्रतिष्ठित लाउडस्पीकरांमध्ये केवळ फॉरवर्ड-फायरिंग ट्रान्सड्यूसर होते, परंतु 901 मॉडेल मध्ये ८ बॅक व १ फॉरवर्ड-फायरिंग ट्रान्सड्यूसर होते. त्यानंतर त्यांनी १९६० च्या दशकात ग्राहकांसाठी एक आगळेवेगळे उत्पादन निर्माण केले ते म्हणजे एक लहान कॉम्पुटर 1001 आणि त्याला 901 स्पिकर्स ला जोडण्यात आले. या मॉडेलला १००० डॉलर पेक्षा कमी किंमतीत विकण्यास त्यांनी वितरकांना मनाई केली. अमर बोस यांनी स्वतः काही हायएंड ऑडिओ मासिकांच्या पत्रकारांना याचे प्रात्यक्षिक सादर केले. याने प्रभावित होऊन तीन पत्रकारांनी चांगल्या प्रकारे केलेल्या समीक्षे मुळे या मॉडेलची विक्री वाढण्यास मदत झाली.


बोस यांनी कंपनीचे स्वरूप कायम प्रायव्हेट ठेवले. यामुळे त्यांना झालेल्या नफ्याची गुंतवणूक संशोधनावर खर्च करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. यामुळे आपल्या क्षेत्रातील बऱ्याच उत्पादनांवर प्रथम अशी मोहोर उमटवता आली. बोस निर्मित पहिल्या Noise Cancellation Headphones साठी एक दशकांहून अधिक काळ व ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले. पण यामुळेच श्रोत्यांसाठी पहिल्यावहिल्या Noise Cancellation Headphones ची निर्मिती झाली. आता याचा वापर हवाई वाहतूक व अंतराळ क्षेत्रात केला जातो.
याचप्रमाणे कंपनीने कार ऑडिओ क्षेत्रातील प्रथम ऑडिओ सिस्टीम ची निर्मिती केली. १९८३ मध्ये कॅडिलॅक कार्स मध्ये याचा वापर करण्यात आला. आज अनेक ऑटो ब्रँड्स या ऑडिओ सिस्टीम चा वापर करतात. सर्वात नवीन कॅडिलॅक सीटी 6 मॉडेलसाठी बनविलेल्या साउंड सिस्टममध्ये 34 स्पीकर आहेत.
अमर बोस नेहमी म्हणत जर ते एखाद्या पब्लिक कंपनीचे CEO असते तर त्यांना किमान १०० वेळा तरी पदावरून दूर केले गेले असते. कारण कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक संस्था संशोधनावर गुंतवणूक करण्यास फारश्या अनुकूल नसतात. अमर बोस हे या अगदी उलट होते.
ते एकदा म्हणाले होते कि, जर मी असे म्हणालो तर, चांगल्या गोष्टी भीती निर्माण करतात, कॉर्पोरेट जगतात सुद्धा लोक चांगल्या बदलांना घाबरतात. तुम्हांला हे हास्यास्पद वाटेल, सगळ्यानांच आणखी चांगले हवे असते. पण आणखी चांगले म्हणजे प्रत्येकवेळी काहीतरी वेगळेच हवे असते आणि जर ते आधी सारखेच असेल तर ते निश्चितच नाविन्यपूर्ण व चांगले नाही असे मानले जाते. हा बदल लोकांमध्ये भीती निर्माण करतो. हा एक प्रकारचा जुगार आहे जिथे तुम्हांला धैर्य लागते.

सौजन्य - CNBC


28 April 2018

फन्डिंग करताना श्री रतन टाटा स्टार्टअप मध्ये नेमके काय पाहतात...

स्वतः च्या क्षमता तपासून पहा 


कागदावरची कल्पना आणि आकडे मला आकर्षित करू शकत नाही. मला आकर्षित करतो तो ती कल्पना मांडणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि त्या मागची पॅशन. एखादी गेमचेंजर कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता हि त्या कल्पनेहून अधिक महत्वाची असते. 

कोणतीही सेवा अधिक वेगाने, अधिक उत्तम रीतीने आणि अधिक स्वस्तात उपलब्ध कशी करता येईल हा प्रश्न याआधी हि लोकांना पडत होताच. पण, आता संगणक व इंटरनेट यांमुळे या प्रश्नाच्या संभाव्य उत्तरांभोवती नव्या कंपन्या उभ्या राहत आहेत. २० वर्षांपूर्वी हे केवळ अशक्य होते. मी देखील काही स्टार्टअप कंपन्यांमध्ये भांडवल गुंतवले. 


मला अनेकदा विचारले जाते कि, भविष्यात मूळ धरू शकणारी आणि बाजारपेठेत टिकू शकणारी स्टार्टअप ची चांगली कल्पना कशी ओळखावी, हा त्यातला प्रमुख प्रश्न. त्याचे त्याचे उत्तर शोधण्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. अश्या कल्पना घेऊन माझ्या मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांना मी विचारतो, इतरांपेक्षा तुम्ही कश्याप्रकारे वेगळा बदल करू शकणार आहात. 

आजवर लोक जे आणि जसे जगत आले आहेत, त्यातला किमान एक तरी अनुभव पूर्णतः बदलण्याची ताकद या तुमच्या प्रस्तावात आहे का? बदल अनेक अर्थांचा असू शकतो. गुणवत्तेचा बदल, बाजारपेठेतल्या विशिष्ट लोकसमूहाच्या जगण्याची गुणवत्ता बदलण्याची आणि सुधारण्याची शक्यता, लोक जसे जगतात- वागतात-खरेदी करतात-विचार करतात त्यात मूलभूत बदल घडविण्याची क्षमता. 

काहीतरी पूर्णपणे वेगळे करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे जगणे अधिक सुलभ होईल. हे ज्यांनी केले, तेच स्टार्टअप्स आजूबाजूच्या गजबजाटात टिकून राहिलेले दिसतात. पण एक नक्की, कागदावरची कल्पना आणि आकडे मला आकर्षित करू शकत नाही. मला आकर्षित करतो तो ती कल्पना मांडणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि त्या मागचे  पॅशन. एखादी गेमचेंजर कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता हि त्या कल्पनेहून अधिक महत्वाची असते. 


स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय करताना गुंतवणूकदार म्हणून तुम्ही स्टार्टअप ची पारख कशी करता हे महत्वाचे आहे. कागदांवरचे आकडे बघून नव्हे, तर त्यांच्या मांडणीतली कळकळ, नेमकेपणा आणि आत्मविश्वास पाहून तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा. मी या तरुण मुलांबरोबर काम करतो. मला त्यांच्या कंपनीच्या प्रवासात सहभागी व्हायला आवडते. या प्रवासात हि मुले मला खूप काही शिकवतात. यासाठीच स्वतःच्या क्षमता पाहायला हव्यात. 

तर मग आहे का तुमच्याकडे एखादी भन्नाट कल्पना...?

-सौजन्य : संध्यानंद 

13 April 2018

धाडसी उद्योजक बनण्यासाठी जॅक मा यांचा कानमंत्र


धाडसी उद्योजक बनण्यासाठी जॅक मा यांचा कानमंत्र


उद्योजकाने दिलखुलास असावे- जॅक मा.

तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या. सल्ला, मदत मागताना आपला स्वाभिमान आड येऊ देऊ नका. 

ज्यांना नोकरीतून बाहेर पडून व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा उद्योजक बनायचे आहे ते तसे धाडस करू शकत नाहीत. कारण, त्यांना नोकरीत उगीचच वाटत असते की  ते फार सुरक्षित आहेत. त्यांच्या मते नोकरीत त्यांना सर्व सोयीसुविधा असतात. पण, जर तुम्हाला उद्योजक व्हायचे असेल तर या सोयीस्कर जागेतून तुम्हाला बाहेर पडावेच  लागेल आणि स्वतःसाठी अशी जागा धुंडाळावी लागेल. 

प्रत्येकाला एका विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट लोकांमध्ये जरा बरे वाटते. पण, उद्योजक म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नकारात्मक उत्तेजना, अनिश्चितता आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. तुम्ही असुरक्षित आहात आणि सुरक्षिततेसाठी जेव्हा एक पाऊल  तुम्ही टाकता, तेव्हा इतरांनाही  तुम्ही तसेच करायला सुचवता. यश हवे असेल तर उद्योजकाने दिलखुलास असायलाच हवे. लोक असेच दिलखुलास व असुरक्षित असावेत, ही माझी भावना आहे. 

एक उद्योजक म्हणून माझ्या दृष्टीने अपयश म्हणजे केवळ पराभव स्वीकारणे, कच खाणे, पुढे जाण्यापासून स्वतःला रोखणे. लोक काय सल्ला देतात, ते बघा. कुणीही तुम्हाला सांगणार नाही, तू पराभूत झालेला आहेस. दिलखुलासपणे, मोकळेपणाने ते एक आणि पुढचे पाऊल टाका. मी माझ्या वर्तुळातल्या लोकांचे सल्ले, सूचना आपल्या जगण्यात सामाविष्ट करत गेलो आणि आतून आधीपेक्षाही जास्त मजबूत झालो. तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक  ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या. 


कोणता सल्ला ऐकावा, कोणता ऐकू नये हे अत्यंत लक्ष देऊन ठरवा. वापरलेला सल्ला उपयोगात आला की नाही, हे बघा. आधी दिशा ठरवा, मग धोरणे. धोरणे ही  तपासून घ्या. मगच ते लागू करा आणि मगच अंमलबजावणी करा. नवनव्या लोकांना भेटत राहा. काम करताना ते आरामदायक कसे होईल, ते बघा. धोरणे आणि अंमलबजावणीवर तुमचे संपूर्ण नियंत्रण हवे म्हणून क्षमतेबरहुकूम काम करा. हे सगळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणूनही पुढे आणते. तुमच्या भोवतालच्या एकूणच वातावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो.

- सौजन्य: संध्यानंद 

26 March 2018

अदभूत शोधाचा असामान्य प्रवास..!!

शिकणे आणि शोध याकडे ध्येयापेक्षा एक प्रवास आणि एक प्रक्रिया म्हणून अनुभवा... गोष्टी बऱ्याच सोप्या आणि अधिक रोमांचक होतील.

 

स्टीफन हॉकिंग यांना २१ व्या वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर गंभीर असा मोटारा न्यूरॉन रोग झाल्याचे निदान करण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्यांना तुम्ही आणखी फक्त दोन वर्षे जीवन जगाल असे निदान केले होते. १४ मार्च २०१८ रोजी स्टीफन हॉकिंग यांचे वय ७६ असताना, डॉक्टरांच्या अंदाजापेक्षा ५५ वर्षे अधिक जीवन व्यतीत करुन निधन झाले. त्यांच्या आयुष्याच्या दीर्घमानापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अत्यंत प्रतिकूल अशा शारिरीक परिस्ठीतीत असतानाही त्यांच्या योगदानाची अर्थपूर्णता आणि समृध्द्ता. आपला वेळ सर्वोत्तम कशा प्रकारे व्यतीत करायच्या याबद्द्ल स्टीफन हॉकिंगच्या जीवनातील काही महत्त्चाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. जसे की स्टीफन हॉकिंग यांच्या अनुसार वेळ हि जगातील खरोखरच सर्वात दुर्मिळ अशी गोष्ट आहे.

बहुमूल्य वेळेचा सदुपयोज करण्यासाठी स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनातील ७ मार्गदर्शक तत्त्वे

१)  बुध्दिमत्ता हि बदलण्यासाठी अनुकूल करण्याची क्षमता आहे
डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिध्दांतानुसार, सर्वात अनुकूलनशील प्रजातीच प्रदिर्घ काळ टिकते. स्टीफन हॉकिंग यांचे जिवन हे पूर्ण वेळ व्हीलचेअर वापरण्यापासून, एखाद्या मशीनचा वापर करुन बोलण्यासाठी अशा प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा उत्कृष्ट नमुना आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बोलण्यात आपली क्षमता गमावल्यानंतर त्यांनी "अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम" आणि "ब्लॅकहोल्स" सारखी बेस्ट सेलींग पुस्तकांचे लेखन केले.

२) अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा ज्या गोष्टी करण्यापासून आपली दुर्बलता आपल्याला रोखू शकत नाही
१९८० च्या दशकाच्या मध्यात, स्टीफन हॉकिंग यांनी बोलण्याची आपली क्षमता गमावली होती, परंतु या कमतरतेमुळे त्यांनी प्राध्यापक होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शित करण्याची किंवा ब्रम्हांडच्या गूढ गोष्टींवर  प्रकाश  टाकण्यासाठी पुस्तके लिहिण्याची त्यांची क्षमता प्रभावित केली नाही . जर स्टीफन हॉकिंग यांनी संवाद साधणे - बोलणे आणि चालणे- हालचाल करणे यांसारख्या शारीरिक कमतरतेच्या गोष्टींबद्दल पश्चाताप केला असता, तर त्यांनी आजमितीस मिळवलेले यश कधीच संपादन केले नसते.

३) प्रत्येक वेळी तुम्ही जे जे पाहता, त्या गोष्टींचे अंतरंग जाणून घ्या .
स्टीफन हॉकिंग यांची वृत्ती जिज्ञासू होती. ते म्हणायचे आकाशातील  ताऱ्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका आकाशातील ताऱ्यांना जगातील रहस्यांसाठी रूपक म्हणून तर "पायांखाली पाहणे" याला आपल्या जीवनातील कमतरता व अडथळे जे आपल्या मनात भीती व न्यूनगंड निर्माण करता या अर्थाने योजले होते. 

४) शोध घेण्याच्या आनंदावर लक्ष केंद्रित करा, पुरस्कारांवर नव्हे
इथे स्टीफन हॉकिंग यांच्या मते संशोधन आणि शोध हा एक प्रवास आहे आणि अंतिम गंतव्य नाही, म्हणून आपल्या शोधावर लक्ष  केंद्रित करून त्याचा आनंद पूर्णपणे अनुभवा ज्या क्षणी आपण बक्षीसाच्या हेतूने रहस्य शोधण्यास सुरुवात करतो, तेंव्हा ती संपूर्ण प्रक्रिया कष्टप्रद होते. हा निश्चितपणे आपला वेळ अधिक उत्पादक आणि विनाव्यत्यय वापरण्यासाठी चांगला दॄष्टिकोन आहे.    
५) माझ्याकडे करण्यासाठी पुष्कळ काही आहे, त्यामुळे मला वेळ वाया घालविणे आवडत नाही. 
स्टीफन हॉकिंग यांचे हे उद्गार तीन कारणांसाठी महत्त्वाचे आहे, पहिले हे दर्शविते की जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेळेचा चांगला व्यवस्थापक कसा बनवू शकतो. दुसरे म्हणजे, स्टीफन हॉकिंग यांनी नेहमीच असे मत मांडले आहे कि गेलेली वेळ परत येत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीचा फोकस केवळ वेळ वाया जात कामा नये याची खात्री करणे यावर असणे आवश्यक आहे. तिसरा महत्त्वाचा स्टीफन हॉकिंग यांचा धडा म्हणजे अतिशय  उच्च व महत्त्वाकांक्षी ध्येयनिश्चिती आणि त्यासाठी स्वतःला कटिबध्द करणे. या मोठया गोष्टि साध्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे "वेळेचा आदर करणे".

६) अडखळल्यानंतर चिकाटी न सोडणे
हि एक अतिशय महत्त्वाची शिकवण आहे. अनेकदा आपण गंभीर समस्यांचा सामना करत असताना मृत अवस्थेत पोहोचतो म्हणजेच हात पाय गाळून बसतो .. स्टीफन हॉकिंग  यांच्या मते, आपली स्थिती ढळू न देता समस्येसोबत पुढे चालत राहणे.   स्टीफन हॉकिंग यांच्या आयुष्यातील उदाहरण म्हणजे, स्टीफन हॉकिंग यांना ब्लॅकहोल्स संदर्भात संशोधन आणि माहितीच्या कमतरतेवरील अडचणी दूर करण्यासाठी २९ वर्षांचा कालावधी लागला, परंतु अशा प्रकारची चिकाटी आणि प्रत्यक्षात आपल्याला आपला वेळ सर्वोत्तम प्रकारे व्यतीत करण्यास मदत करतात. 

7) जर आपल्याकडे तक्रार करण्यासाठी वेळ आहे, तर आपल्याकडे उपाय शोधण्यासाठी नक्कीच वेळ आहे.
हे सर्व समस्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्या सारखे आहे, अनेकदा आपण उपायांपेक्षा समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतो. अशा परिस्थितीत समस्यांवर समाधान शोधण्यासाठी पावले उचलण्या ऐवजी त्या अडथळ्यांमुळे आपल्याला मानसिक अपंगत्व येते . अशा समयी वेळेच व्यवस्थापन अतिशय उपयुक्त ठरते. म्हणून स्टीफन हॉकिंग यांनी म्हटल्याप्रमाणे "समस्येबद्दल तक्रार करण्यासाठी वेळ वाया घालवण्यावपेक्षा त्या समस्येवर समाधान  शोधण्यासाठी प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर ठरते." 


- गगन सिंगला

02 February 2018

“फॉरेन” चे वाटणारे हे ब्रँन्ड्स“स्वदेशी” आहेत..!

“फॉरेन” चे वाटणारे हे ब्रँन्ड्स“स्वदेशी” आहेत..!

तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत तुम्ही ज्या ब्रँन्ड्सना विदेशी समजून त्यांच्या वस्तू खरेदी करत होते, त्यांपैकी अनेक ब्रँन्ड विदेशी नसून स्वदेशी आहेत…! काय, बसला ना धक्का?! “मी फक्त अमुक अमुक ब्रान्डचं वापरतो”, “आपल्याकडील ब्रँन्ड्स मला जमत नाही” असं म्हणून तुम्ही ज्या ब्रँन्ड्सच्या वस्तू वापरता त्यापैकी अर्ध्याधिक या मूळच्या स्वदेशी आहेत…!
पीटर इंग्लंड (Peter England)
हे ब्रँड आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचे आहे. पीटर इंग्लंड हे आयर्लंडमध्ये स्थापन झालं. 1997 साली मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइल यांनी mid-price shirt विभागात या ब्रँडला भारतात लॉन्च केले. तर  2000 साली या कंपनीने ब्रँडसाठी जागतिक अधिकार प्राप्त केले. पीटर इंग्लंड भारतातील खूप मोठे मेन्सविअर ब्रँड असून दरवर्षी या ब्रँडचे ५ मिलिअन कपडे विकले जातात.

दी रेमंड ग्रुप (The Raymond Group)
दी रेमंड ग्रुप हे एक भारतीय ब्रँडेड फॅब्रिक आणि फॅशन रिटेलर आहे. 1925 मध्ये ही कंपनी स्थापन करण्यात आली. हे ब्रँड सूट फॅब्रिकचे उत्पादन करते. हे ब्रँड जी. के. ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या मालकीचे आहे.

अमेरिकन स्वॅन (American Swan)
दी अमेरिकन स्वॅन लाइफस्टाइल कंपनीचे CEO अनुराग राजपाल यांची या ब्रँडवर मालकी आहे.

हायडिजाईन (HiDesign)
हायडिजाईन हा ब्रँड चामड्याच्या वस्तू बनवतो. हा ब्रँड Entrepreneur दिलीप कपूर यांच्या मालकीचा आहे.

अॅलेन सॉली (Allen Solly)
हे देखील एक भारतीय ब्रँड असून ते आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचे आहे.


नॉटी डर्बी आणि आर्डेन शूज (Knotty Derby and Arden Shoes)
हा ब्रँड Sumanglam Impex प्राइवेट लिमिटेड यांच्या मालकीचा आहे.

लुई फिलीप (Louis Philippe)
लुई फिलिप हा पुरुषांच्या कपड्यांचा प्रमुख भारतीय ब्रँड आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या मदुरा फॅशन अँड लाइफस्टाईलचा हा एक ब्रँड आहे. हा ब्रँड 1989 साली लॉन्च झाला. 2013 पर्यंत भारतातील हा सर्वात मोठा कपड्यांचा ब्रँड होता.

दी कलेक्टिव्ह (The Collective)
हा एक भारतीय ब्रँड असून तो आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचे आहे.

वेस्टसाईड (Westside)
भारतात वेस्टसाईड हा ब्रँड ट्रेंट चालवते, ट्रेंट ही टाटा ग्रुपची रिटेल शाखा आहे. ट्रेंट हे १९९८ साली सुरु झाले.

फ्लाइंग मशीन (Flying Machine)
फ्लाइंग मशीन हा ब्रँड अरविंद ग्रुपचे सीईओ आणि एमडी संजय लालभाई यांच्या मालकीचे आहे.


पार्क एव्हेन्यू, पार्क्स आणि कलर प्लस (Park Avenue, Parx and ColorPlus)
पार्क एव्हेन्यू, पार्क्स आणि कलर प्लस हे ब्रँड्स रेमंड या कंपनीच्या मालकीचे आहेत.

स्पायकर (Spykar)
1992 साली स्पायकर ची सुरवात झाली. खासकरून युवा पिढीसाठी हा ब्रँड काम करतो. प्रसाद पाब्रेकर स्पायकर लाईफस्टाईल प्रायवेट लिमिटेडचे फाउंडर आहेत. तर हा ब्रँड COO संजय वखारिया यांच्या मालकीचेआहे.

दा मिलानो (Da Milano)
उद्योजक साहिल मलिक यांच्या मालकीचा असलेला दा मिलानो हा विदेशी वाटणारा ब्रँड स्वदेशी आहे. हा ब्रँड बॅग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.

प्लॅनेट फॅशन (Planet Fashion)
हा देखील एक भारतीय ब्रँड असून तो आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचा आहे.

मॉन्टे कार्लो (Monte Carlo)
मॉन्टे कार्लो हा ब्रँड विदेशी नसून भारतीय आहे. तो ओसवाल वूलेन मिल्स लिमिटेडचे सीईओ जवाहरलाल ओसवाल यांच्या मालकीचा आहे. 1984 साली या ब्रँडची स्थापना झाली.

हे सर्व वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच झाले असेल. शिवाय यावरून तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की आपले स्वदेशी ब्रँड्स हे विदेशी ब्रँड्सपेक्षा कमी अजिबातच नाहीत…!
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites